श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
लवकरच मिळणार राशन दुकानातून गरिबांना दिवाळीचा गिफ्ट
राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी ‘गिफ्ट’ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे यामध्ये चार वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ शंभर रुपयांत लवकरच देण्यात येणार आहे.
दिवाळीच्या विशेष मुहूर्तावर राज्यातील शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत किराणा सामान देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या 100 रुपयांमध्ये रवा, खाद्यतेल, शेंगदाणे आणि पिवळी मसूर यांचे पॅकेज असणार आहे. मंगळवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने हा विशेष रेशनचा पदार्थ देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळं 100 रुपयात दिवाळीच्या तोंडावर लवकरच गरिबांना “आनंदाचा शिधा” मिळणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने हा प्रस्ताव दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 7 कोटी लोकांना फायदा होणार आहे. हे 100 रुपयांचे किराणा पॅकेज रेशनकार्डधारक रेशन दुकानातून खरेदी करू शकतात.
महागाईच्या युगात सर्वसामान्यांना मिळेल दिलासा
विशेष म्हणजे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते, सध्या किरकोळ महागाई दर 7% आहे. देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे सरकारने गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना मोठा दिलासा देत केवळ 100 रुपयांना किराणा माल देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशनचा हा पदार्थ लोकांना मिठाई तयार करण्यात मदत मिळणार आहे.
कोणत्या वस्तू मिळणार ?
प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.
हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येणार आहे. त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल तसेच या शिधावस्तूंचा वाटप दिवाळी पूर्वी होणार असेही राज्य सरकारने म्हटले आहे