नागपूर प्रतिनिधी , न्यूज जागर
अन्न व औषध प्रशासन विभागाची माहिती
नागपूरमधील ‘हल्दीराम’ या कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क खोटे व दिशाभूल करणारे दावे केलेले आहेत, अशी धक्कादायक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (SIT ) माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेली आहे.
वास्तविक या बर्फीच्या चकचकीत बॉक्सवर ‘ऑरेंज बर्फी’ असे लिहिले असून मागील बाजूस बारीक अक्षरात घटक पदार्थांची (ingredients) माहिती प्रसिद्ध केलेले आहे. त्यात ऑरेंज पल्पचे प्रमाण फक्त २ टक्के आहे, असे केवळ दोन शब्दांत छापलेले आहे. बाकी निव्वळ साखर, कोहळा आणि घातक रसायने असल्याचे नमूद केले आहे.
‘स्प्राऊट्स’च्या इन्व्हेस्टीगेशन टीमने माहितीच्या अधिकारामार्फत माहिती मागवली. त्यावर नागपूरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने या प्रॉडक्ट्सच्या नमुन्याचा विश्लेषण अहवाल दिला आहे. यात कुठेही संत्री व कोहळ्याचा उल्लेखही केलेला नाही. इतकेच नव्हे तर ‘ऑरेंज पल्प’चाही उल्लेख केलेला नाही.
एकंदरीतच ‘हल्दीराम’ने घटक पदार्थांची (ingredients) लिहिलेली यादी ही फसवी व ग्राहकांची दिशाभूल करणारी आहे. केवळ आकर्षक पॅकिंग बनवून फळांचे कृत्रिम स्वाद यात वापरलेले आहे व त्या जोडीला भरमसाठ रिफाईंड साखर टाकलेली आढळते. ही साखर मधुमेहसारख्या भयानक आजारांना आमंत्रण देणारी आहे.
‘हल्दीराम’ने त्यांच्या बहुतेक खाण्याच्या प्रोडक्ट्समध्ये ही फसवणूक केल्याचे आढळून येत आहे. मात्र कंपनीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाशी असलेल्या ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळे ग्राहकांची ही खुलेआम फसवणूक वर्षानुवर्षे चालू आहे . याप्रकरणी या विभागाचे सहायक आयुक्त अ. प्र. देशपांडे यांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी व ‘हल्दीराम’च्या सर्वच प्रॉडक्ट्सची सखोल चौकशी करण्यात यायला हवी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजीवकुमार सदानंद यांनी केली आहे.