माजरी, चारगाव, ढोरवासा परिसरात वाघांची दहशत कायम

श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

वेकोलिच्या बंद पडलेल्या कोळसा खाणीमुळेच वाघांचा शिरकाव

 

माजरी- वेकोलिच्या चारगाव, तेलवासा, ढोरवासा, नवीन कुनाडा आणि जूना कुनाडा या बंद पडलेल्या कोळसा खाणीच्या परिसरात मोठे जंगल तयार झाले असून त्यामुळेच माजरी परिसरात वन्यप्राण्यांचा शिरकाव झाला असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान वेकोलिमुळे निर्माण झालेल्या जंगलीमुळे वन्यप्राण्यांना लपुन बसण्याची जागा निर्माण झाली आहे. त्यामुळे माजरी परिसरात वाघांचा वावर असून आता ते नागरिकांवर हल्ले करणे सुरु केले आहे.

दरम्यान ऐन दिवाळीच्या दिवशी विकास कोल या खासगी कंपनीत कार्यरत कामगाराला नरभक्षी वाघाने ठार केल्याची दुर्दैवी घटना माजरी येथे दिनांक २४ ऑक्टोबर रोजी रात्री साढे आठ वाजताच्या सुमारास घडली.
दीपू सियाराम महतो वय ३८ वर्ष रा. न्यू हाउसिंग, वार्ड क्र.१ असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतक युवकाचे नाव आहे. दीपू महतो हा काम करुन घराकडे परत येत असताना रात्री साडे आठच्या सुमारास त्याच्याच घराजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले.

नरभक्षी वाघाची दहशत कायम असून ऐन दिवाळीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने महतो परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत वन विभागाने वेकोलिच्या इलेक्ट्रिक मेंटेनेंस सेक्शनच्या मागे सुमारे ११ कॅमेरा ट्रॅप लावले होते. त्यापैकी एकही कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाची उपस्थिती चित्रित झाली नाही तसेच वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने लावलेले पिंजरे वाघाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत दिवसरात्र घालवत आहेत. पण वाघ मात्र पिंजऱ्यांला हुलकावणी देत आहे.

दरम्यान सोमवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक वाघ ओपनकास्ट माइनच्या जुन्या काली माता मंदीर परिसरात मुक्त संचार करताना वनविभाग आणि माजरी पोलिसांच्या अधिकाऱ्यांना दिसून आला. दरम्यान सदर वाघ दुसऱ्या वाघाला बोलाविण्यासाठी विचित्र आवाज देताना ऐकायला मिळाले. दरम्यान वनविभाग व पोलिसांच्या वाहनाला पाहुन पाठलाग करू लागला. काही अंतर गाठल्यावर वाघ चारगाव, ढोरवासाच्या दिशेने वळला. दरम्यान सदर वाघाने ढोरवासा येथील साधु वरखडे यांच्या गाईची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न तोकडे पडतात काय? असाही प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे. वाघाने नागरिकांसह जनावरांवर हल्ला केल्याचे वृत्त समजल्यावर वन विभागाचे अधिकारी पंचनामे करतात आणि वाघांचा बंदोबस्त केल्या जाईल, असे गावकऱ्यांना सांगुन निघून जातात. मात्र, वाघाचा बंदोबस्त झाल्याचे दिसून येत नाही. वाघाचे शिकार होत असल्याने माजरीसह आसपासच्या गावातील नागरिकांमध्ये वाघाची दहशत वाढली आहे.
दरम्यान ग्रामपंचायतीकडे विविध योजनेतील बंदीश्त निधी असल्यामुळे वाघापासून नागरिकांसाठी उपाययोजना करताना ग्रामनिधी व्यतिरिक्त दूसरे कोणतीही निधी उपलब्ध नाही. त्यामुळे माजरी हे मोठे गाव असून, माजरी परिसरात वाघांचा हल्ला लक्षात घेत शासनाने माजरी ग्रामपंचायतीला विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात यावा. अशी मागणी होत आहे.

नरभक्षी वाघ माजरी परिसर सोडले असून,सद्या त्या वाघीणीचे बस्तान चारगाव,ढोरवासा या परिसरात असून सदर वाघ त्या परिसरात जनावरांचे शिकार करीत आहे. वाघांचा शोध घेण्यासाठी मंगळवारी चारगाव, ढोरवासा परिसरात लावण्यात आलेल्या पाच कैमरा ट्रैप पैकी एक कैमरात वाघ संचार करताना चित्रीत झाला आहे.
– धनराज गेडाम, वनरक्षक वनविभाग , भद्रावती