वाहनगाव येथील नागरिक “आनंदाचा शिधाच्या “आनंदा” पासून वंचित

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर

वाहनगाव येथील नागरिकांचा “आनंदाच्या शिधाचा आनंदच हिरावला”

अंत्योदय व प्राधान्य गटातील गरीब नागरिकांची दिवाळी आनंदात व्हावी, म्हणून शासनाने १०० रुपयांत आनंदाचा शिधा म्हणून स्वस्त धान्य दुकानातून साखर, चणाडाळ, रवा व तेल प्रत्येकी एक किलो याप्रमाणे रेशनकार्डधारकास अनेक गावात वाटप करण्यात आले. मात्र चिमूर तालुक्यातील वहानगाव येथील २८९ लाभार्थी प्रशासनाच्या वेळकाढपणामुळे दिवाळीला मिळणाऱ्या आनंदाचा शिधाच्या आनंदापासून वंचित राहिले आहेत.

वहानगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मंगलाबाई गौरकर यांच्याकडे होता. त्यांच्या मृत्यूनंतर स्वस्त धान्य दुकानाचा परवाना त्यांचे वारस म्हणून सूरज रामटेके यांच्या नावाने करण्यात आला. कोरोनाकाळात धान्याच्या अफरातफरीप्रकरणी गावातील रोष पाहता सूरज रामटेके यांच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात रद्द करून वहानगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेला जोडण्यात आला. मूळ परवानाधारकांचे कागदपत्र न तपासता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आदिवासी विविध कार्यकारी संस्था वहानगाव येथील लाभार्थीना धान्य वाटप करत असताना त्याच्याकडे असलेला धान्य वाटप परवाना काढून मूळ परवानाधारकांना दिला. या निर्णयामुळे लाभार्थी व नागरिक यांच्यात असंतोष निर्माण झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी चिमूर वरोरा राज्यमहामार्ग जवळपास तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले होते. तर पोलिसांत तक्रारीही झाल्या. ग्रामस्थांचे गर्हाणे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याकडे मांडण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सूरज रामटेके यांना देण्यात आलेला परवान्याची चौकशी होईपर्यंत दिवाळीतील आनंदाचा शिधा व स्वस्त धान्य हे वहानगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था येथून वाटप होईल, असे सांगितले. दरम्यान ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. मात्र अन्न पुरवठा अधिकारी, निरीक्षक, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे वहानगाव येथील प्राधान्य व अंत्योदयचे अंदाजे २८९ लाभार्थी दिवाळी पर्वावर आनंदाचा शिधा च्या आनंदापासून वंचित राहिले. येत्या सात दिवसांच्या आत वहानगाव येथील लाभार्थीना न्याय द्यावा, अन्यथा ग्रामस्थ व लाभार्थीच्या न्याय अधिकारासाठी आंदोलन करण्याचा इशारा वहानगावचे सरपंच प्रशांत कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.