श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा, न्यूज जागर
कोरची,दि.३१/०१/२०२३
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील आदिवासी कंवर समाजातील समाजसेविका कुमारीबाई जमकातन यांना २८ जानेवारी रोजी पुणे येथे संघर्ष पुरस्कार आणि नंदिनी जाधव (पुणे) यांना प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हे दोन्ही कार्यकर्ता पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे आहेत.
अमेरिका स्थित महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा मागिल 28 वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे. 2022 या वर्षीचे एकूण 11 पुरस्कार प्रदान 12 डिसेंबर 2022 रोजी फाऊंडेशनने घोषीत केले होते. ते पुरस्कार प्रदान करण्यासाठी 28 जानेवारी रोजी पुणे येथे टिळक स्मारक मंदिराच्या सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
ज्ञानपीठ विजेते मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव भालेराव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर फाउंडेशनच्या ज्येष्ठ सदस्या शोभा चित्रे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
साहित्यामध्ये साहित्य जीवन गौरव पुरस्कार रंगनाथ पठारे (संगमनेर) यांना, कथा व कादंबरी लेखनासाठी वाङ्मय प्रकार पुरस्कार राजन गवस (गारगोटी) यांना आणि अनुवाद व लेखन या क्षेत्रातील कामासाठी विशेष पुरस्काराने सोनाली नवांगुळ (कोल्हापूर) यांना सन्मानितकरण्यात आले आहे. जीवनगौरव पुरस्कार दोन लाख रुपये व स्मृतीचिन्ह या स्वरूपाचा असून वाङ्मय प्रकार पुरस्कार व विशेष पुरस्कार प्रत्येकी एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात आहेत.
अनिल साबळे (मंचर) यांना ‘पिवळा पिवळा पाचोळा’ या कथासंग्रहासाठी ललित ग्रंथ पुरस्कार, शरद बाविस्कर (दिल्ली) यांना त्यांच्या ‘भुरा’ या आत्मकथनासाठी अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार देण्यात आला आहे. तर रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार संदेश कुलकर्णी (मुंबई) यांच्या ‘पुनश्च हनिमून’ या नाटकासाठी दिला गेला आहे. दोन्ही ग्रंथ पुरस्कार आणि नाट्यलेखन पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात प्रदान केले गेले.
समाजकार्याच्या क्षेत्रामध्ये दोन विशेष कार्य पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये शांताराम पंदेरे (औरंगाबाद) यांना दलित आणि भूमिहीनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्यासाठी आणि प्रमोद झिंजाडे (करमाळा) यांना त्यांनी गेल्या वर्षभरात विधवा प्रथा निर्मूलनाच्या संदर्भात केलेल्या कार्यासाठी हे विशेष कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. हे दोन्ही विशेष कार्य पुरस्कार प्रत्येकी एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील आहेत. याशिवाय डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार यावर्षी ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क (नवी दिल्ली) या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी साधना ट्रस्टचे विनोद शिरसाठ व हेमंत नाईकनवरे आणि मासुम महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळाच्या मनीषा गुप्ते, रमेश अवस्थी, लीला फास्के यांनी विशेष परिश्रम घेतले.