तोडगा न निघाल्याने व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद सुरूच

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर 

सुरजागड लोह खदानीच्या अवजड वाहतुकीमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे त्रस्त झाल्याने आलापल्ली शहरातील बाजारपेठ दुकाने, हॉटेल व्यवसायिक, भाजी विक्रेते, किराणा व्यवसायिक, डॉक्टर आणि फार्मसी सह संपूर्ण  व्यापाऱ्यांसह नागरिकांनी शासनाच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला आहे.

याबाबत व्यापारी संघटना आणि सुरजागड लोह खदानीचे अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यात बैठक होऊन कोणताच तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरून  दुसऱ्या दिवशी सुद्धा व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद कडकडीत सुरू राहिला

बायपास रस्ता तयार करावा, सुरजागड येथील लोह खनिज वाहतूक रात्री १०.०० ते सकाळी ५.०० पर्यंतच सुरू ठेवावी, सर्व लोह खनिज वाहतूक करणाऱ्या गाडया ओव्हरलोड भरू नये, लोह खनिज वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर ताडपत्री लाऊन वाहतूक करावी, व्यापाऱ्यांसह नागरिकांनी केलेल्या या मागण्यांवर चर्चा झाली, परंतु या मागण्या शासन किंवा सुरजागड खाण कंपनीचे अधिकारी मान्य करण्यास तयार नाहीत. आणि व्यापारी संघटना देखील आपल्या रास्त मागण्यांबाबत समझोता करण्यास तयार नाहीत त्यामुळे हे बेमुदत बंद आंदोलन चिघळणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.