चामोर्शी प्रतिनिधी, न्यूज जागर
चामोर्शी
तालुक्यातील लखामपूर बोरी परिसरातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला त्यानुसार अर्धवट इमारत बांधकाम व सदर इमारतीचा लोकार्पण सोहळा ग्रामपंचायत कमिटीचा व गावकऱ्यांचा विरोध असताना सुद्धा तत्कालीन पालकमंत्री व विध्यमान मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडला.आता माञ सुसज्ज इमारत होऊन ही प्रत्यक्ष त्या नवीन इमारतीतून कारभार सुरू झाला नसल्याने जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालून नव्या इमारतीतून कारभार सुरू करावा अन्यथा आंदोलन उभारण्यात येणार आहे असा इशारा सरपंच किरणताई सुराजागडे, उपसरपंच विनोद भोयर, सदस्य भाग्यवान पिपरे, अरुण सुराजागडे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे .
लखामपूर बोरी हे १६ गावचे मध्यवर्ती ठिकाण असून लोकसंख्या १७ हजार २४३ आहे . या आरोग्य केंद्रांतर्गत ६ उपकेंद्राचा समावेश आहे . ४ डिसेंबर २९२१ रोजी या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे पालकमंत्री ना . एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला दरम्यान बोलताना पालकमंत्री म्हणाले या भागातील रस्ते , आरोग्य , शिक्षण , या प्रमुख समस्या तातडीने सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले माञ नवीन इमारत लोकार्पण सोहळा पार पडून ५ महिन्याचा कालावधी लोटूनही अजूनही त्या इमारतीतून कारभार सुरू झाले नसल्याने सदर इमारत सध्या शोभेची वास्तू ठरू पाहत आहे .सुसज्ज इमारत आहे मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे व कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकारी अजूनही उपलब्ध झाले नसल्याने जुन्याच इमारतीतून कारभार सुरू आहे .गावाच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा इमारती जवळ सदर इमारत उभी आहे मात्र कोट्यवधी रुपये खर्चून ज्या उद्देशाने इमारत बांधकाम झाले त्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे .
गावात आरोग्य केंद्र असूनही पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक उपचारासाठी तालुका स्थळी जाऊन उपचार घेत आहेत त्यामुळे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे जनतेच्या आरोग्याचा विचार करुन तात्काळ रिक्त पदे भरून त्या नवीन इमारतीतून आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सरपंच, उपसरपंच व इतर सदस्यांनी केली आहे.