प्रस्तावित वन्य जीव अभयारण्य निर्मिती तत्काळ थांबविण्यात यावी

श्री.विलास ढोरे , वडसा  तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर 

आमदार कृष्णा गजबे यांची वन मंञ्यांकडे मागणी

गडचिरोली जिल्ह्यातील विपुल वन संपदेच्या आधारावर येथील नागरिकांचे जीवनमान अवलंबून असल्याने उपलब्ध जंगलांचे अभयारण्यात रुपांतर करण्यात आल्यास स्थानिक नागरिकांचे रोजगार प्रभावीत होण्यासह शासनाला मिळणाऱ्या कोट्यावधी महसुलावर पाणी फेरल्या जाण्याची दाट शक्यता लक्षात घेता प्रस्तावित वन्य जीव अभयारण्य निर्मिती प्रक्रिया तत्काळ थांबविण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा असुन अतिदुर्गम,डोंगराळ भागात वसलेला असल्याने या भागातील नागरिकांचे जीवनमान पुर्णता उपलब्ध वन संपदेवर अवलंबून आहे. शेतमजुरी शिवाय अन्य कुठलाही पर्याय नसल्याने नागरिकांना जंगलातील तेंदुपत्ता,मोहफुले संकलन, बांबु व वनातील इतर गौण वनोपजाचे संकलन करून मिळणाऱ्या उत्पनातुन आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार प्राप्त होत असले तरी शासनालाही याच माध्यमातून कोट्यावधीचा महसूल देखील प्राप्त होतो.

अशा परिस्थितीत आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या वनाचे वन्यजीव अभयारण्यात रुपांतर करण्याची वन विभागाकडुन कारवाई करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने वर नमुद केल्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नागरीक वनांतुन मिळणाऱ्या उत्पनावर अवलंबून असल्याने जिल्ह्यात वन्यजीव अभयारण निर्माण करण्यात आल्यास नागरिकांना वनात जाण्यास व निस्तार हक्कावर बंधन येऊन त्यांचेवर उपासमारीची वेळ येण्याची दाट शक्यता निर्माण आहे.

यामुळे शासनाला सुद्धा वन गौण उपजातुन मिळणाऱ्या महसुलास मुकावे लागेल.एकंदरीत उपलब्ध जंगलांचे वन्यजीव अभयारण्यात रुपांतर करण्यात आल्यास अनेकांचे रोजगार हिरावल्या जाण्याची दाट शक्यता लक्षात घेता प्रस्तावित वन्यजीव अभयारण्य निर्मिती प्रक्रिया तत्काळ थांबविण्याची मागणी आमदार गजबे यांनी राज्याचे वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.याबाबत वनमंत्री काय निर्णय घेतात याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागुन आहे.