जन्मदात्या आईचीच पोटच्या मुलीने केली निर्घृण हत्या

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

सिंदेवाही तालुक्यातील मौजा नलेश्वर या गावी राहणाऱ्या तानाबाई महादेव सावसाकडे वय 65 वर्षे यांची दिनांक 3/ 10/ 2022 रोजी रात्री हत्या झालेली असून तिचे अंत्यविधी गावातील स्मशानभूमीत करण्यात आलेले आहे व ती हत्या घरातीलच व्यक्तींनी केलेली असल्याची तक्रार मृत महिलेची मुलगी रंजना रामेश्वर सोनवणे हिने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे येऊन दिली.
अशा प्रकारची तक्रार प्राप्त होताच सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांनी Psi महल्ले, Psi ढोके, Hc सोनुले, Pc ढोकळे, रहाटे, श्रीरामे, मदारे, मातेरे असे पोलीस पथकासह घटनास्थळी रवाना झाले. नलेश्वर या गावातून मृत महिलेची मुलगी नामे वंदना खाते व सून नामे चंद्रकला सावसाकडे यांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान दोन्ही महिलांनी पोलिसांना सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली.
सखोल चौकशी चौकशी अंति मृत महिलेची मुलगी वंदना हिने तिचे आईला दिनांक 3/ 10/ 2022 रोजी शेतीचे जमिनीचे वादावरून झालेल्या भांडणामध्ये वंदना व तिची वहिनी चंद्रकला या दोघींनी मिळून आईचे नाक व तोंड दाबून क्रूर पणे तिला ठार मारले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गावात कोणालाही माहिती पडू न देता तिचे अंत्यविधी गावाचे बाहेर जमिनीमध्ये पुरून उरकण्यात आले असल्याची कबुली दिली.
सदर प्रकरणांमध्ये कलम 302, 201, 506, 34 भा. द. वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश घारे करीत आहेत.