पॉवर प्लॉन्ट मधील भीषण स्फोटात अभियंता ठार तर मजूर जखमी

श्री विलास ढोरे, वडसा तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर

 

देसाईगंज शहरानजीकच्या जुनी वडसा येथील ए. ए. एनर्जी थर्मल पॉवर प्लांटमध्ये आज (दि. २७) सकाळी बॉयलरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. संजय सिंग (वय ३०, रा.रिवा, मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. तर गोवर्धन केळझरकर (रा. कुरुड) व शेंडे (रा. जुनी वडसा) अशी जखमी मजुरांची नावे आहेत.

दि.२७ ला  पहाटे अभियंता संजय सिंग पॉवर प्लांटमधील प्रॉडक्शन लाईनची पाहणी करण्यासाठी गेले होते. साडेचारच्या सुमारास स्टीम लाईनमधील बॉयलरचा अचानक स्फोट झाला. यात संजय यांचा मृत्यू झाला. यावेळी उपस्थित मजूर गोवर्धन केळझरकर व शेंडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

ए. ए. एनर्जी प्लांट मागील काही महिन्यांपासून बंद होता. कालच तो सुरु झाला होता. मात्र, आज एका अभियंत्याला प्राण गमवावे लागले. एए एनर्जी लिमिटेडचा पॉवर प्लांट सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहीला आहे. प्रदूषण व अन्य विषयांवर नागरिकांनी यापूर्वी अनेकदा आंदोलने केली आहेत.