श्री.अरुण बारसागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
नागरिकांत भीतीचे वातावरण – आंदोलनाचा इशारा
वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रात नव्याने सुरू झालेल्या सास्ती भूमिगत खाणीचे धोपटाला खुल्या कोळसा रूपांतरित कोळसा खाणीत गेल्या तीन-चार दिवसांपासून उत्खननासाठी शक्तिशाली सुरुंग स्फोट केले जात आहेत. यामुळे खाणी शेजारीच असलेल्या सास्ती गावाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या ब्लास्टिंग मुळे सास्तीवासी या स्फोटाच्या धक्क्यामुळे चांगलेच भयभीत झाले आहेत.
दररोज सायंकाळी चार ते साडे चार वाजता होणाऱ्या या ब्लास्टिंग ची मोठी भीती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामवासी आगोदरच सास्ती कोळसा खाणी च्या ब्लास्टिंगणे त्रस्त असताना आता नव्याने हा त्रास सुरू झाला आहे. सास्ती व आता धोपटाला अशा दोन्ही कोळसा खाणीच्या मधोमध गाव आल्याने येथील जनता मोठी कचाट्यात सापडली आहे.
सास्ती गावात जुनी भूमिगत कोळसा खाण अनेक वर्षांपासून सुरू असल्याने गाव खालून पूर्णतः पोखरून गेले आहे. त्यात नव्या खुल्या कोळसा खाणीने व तेथील शक्तिशाली स्फोटाने घुग्गुस गावा प्रमाणे गाव जमीनदोस्त तर होणार नाही, अशी साधार भीती येथील नागरिकांना वाटू लागली आहे. सास्ती गावाजवळ कोळसा खाणी आणि कोळसा वाहतूक होणारा रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य असते. या प्रदूषणाच्या विरोधात गावातील ग्रामपंचायत किंवा राजकीय नेते आवाज उठवीत नाहीत. या गावाचे सरपंच हे वेकोलि कर्मचारी असल्याने ते कधीही वेकोलि कडे नागरीकांचे गाऱ्हाणे मांडताना दिसत नाहीत. आता तर सारखा मारा सहन करणाऱ्या या हादऱ्याने घरांना भेगा पडून घरे जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या ब्लास्टिंग च्या वेळी गावातील लोकांना जीव मुठीत घेऊन होणाऱ्या परिणामांची वाट बघावी लागत आहे. अनेक जण यावेळी घराचे बाहेर येऊन बसतात. सास्ती गावकरी या भीषण परिस्थितीला सध्या सामोरे जात आहेत.
वेकोलीने लोकांच्या जीवनाशी खेळू नये, येथे होणारे अधिक शक्तिशाली स्फोट वेळीच थांबवावे, गावाचे योग्य स्थळी सोयीसुविधा देऊन पुनर्वसन करावे अन्यथा वेकोलि विरोधात तीव्र आदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे.