श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
सिंदेवाही: हवामान अंदाज ०८ डिसेंबर २०२२:
बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू- पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याची आणि पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे. या प्रदेशांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर येथून प्राप्त झालेल्या सध्यस्थितीतील (०८ डिसेंबर) हवामान अंदाजानुसार या वादळी प्रणालीच्या प्रभावाखाली दिनांक १० ते १२ डिसेंबर दरम्यान विदर्भातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
कृषि क्षेत्रातील करावयाच्या उपाय योजना
स्थानिक हवामान अंदाज घेऊनच शेती कामाचे नियोजन करावे, शेतकरी बंधूनी धान पिकांची मळणी राहिली असल्यास त्यांनी मळणी करून बियाणेसुरक्षीत ठिकाणी साठवणूक करावी , धान पिकाची मळणीची कामे शक्य नसल्यास ताडपत्रीच्या सहायाने झाकून ठेवावे, कपाशी पिकामधील फुटलेल्या कापसाची त्वरित वेचणी करावी, वेचलेला कापूस सुरक्षित ठिकाणी साठवावा, इतर काढणी केलेले शेतमाल गोळा करून शेड मध्ये किंवा होग करून ताडपत्रीने पोलीचिनने झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. ढगाळ / पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता असल्यामुळे उभ्या पिकामध्ये ओलीताची व किटकनाशक फवारणीची कामे टाळावीत.
जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामीण कृषि मोसम सेवा, विभागीय कृषि संशोधन केंदाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अनिल कोल्हे यांनी केले आहे.