नंदकिशोर नल्लुरवार प्रतिनिधी न्यूज जागर, चामोर्शी
चामोर्शी, दि.१७/१२/२०२२
चामोर्शी तालुका मुख्यालया पासुन जवळच असलेल्या सोनापूर तलाठी साजा क्रमांक १८ मौजा भोगणबोडीच्या शेतकऱ्यांना जमीन शर्त भंग झाल्याचे सांगून जमीन वर्ग-१ करण्यासाठी तातडीने ७५ टक्के रक्कम शासनास भरावयास सांगितले आहे. अंदाजे एकरी १. ५ लाख रुपये शासनाकडे तातडीने जमा न केल्यास तुमची जमीन जप्त करून शासन दरबारी जमा करण्यात येईल अशी धमकी सोनापुरचे तलाठी यांनी भोगनबोडीच्या शेतकऱ्यांना दिली. याविरोधात शेतकऱ्यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांची भेट घेत या तलाठ्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी शेतकऱ्यांनी सध्याच्या कोणत्याही परिस्थतीत पैसे भरू नये अशी सूचना केली आहे. शेतकऱ्यांकडून अशी जबरन वसुली करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करू, आवश्यकता पडल्यास विधानसभेत प्रश्नही मांडू असे आश्वासन या निवेदनकर्त्या शेतकऱ्यांना दिले आहे.